व्हीएसआरएस न्युज सुरत..निवडणूक प्रचार सभेमध्ये ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०१९ साली केले होते. त्याविरोधात गुजरातमध्ये दाखल अवमान खटल्यामध्ये आपला जबाब नोंदविण्यासाठी गांधी यांनी सुरत येथील न्यायालयात गुरूवारी हजेरी लावली.
गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेस मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भादंवि कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी सर्व मोदी चोर असतात असे वक्तव्य करून संपूर्ण मोदी समुदायाचा अवमान केल्याचे पूर्णेश मोदी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. त्यावरोधात सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना आपला अंतिम जबाब नोंदविण्यासाठी २४ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राहुल गांधी गुरूवारी सुरत येथे दाखल झाले आणि त्यांनी आपला जबाब नोंदविला.
प्राप्त माहितीनुसार, आपण कोणत्याही विशिष्ट समाजास लक्ष्य करण्यासाठी सदर वक्तव्य केले नव्हते. निवडणूक प्रचाराच्या दरम्यानची ती एक राजकीय टिप्पणी होती. त्यामुळे त्याविषयी फार काही आठवत नसल्याचा जबाब राहुल गांधी यांनी नोंदविला असल्याचे समजते.
काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकमध्ये कोलार येथे एका प्रचारसभेत संबोधित केले होते. त्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… या सर्वांचे आडनाव मोदी आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते’ अशी टिप्पणी केली होती.
Discussion about this post