व्हीएसआरएस न्युज मुंबई : एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.
महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्याने तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे.
संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले असून खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे.
घटत चाललेल्या कोळशाच्या साठ्यामुळे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली. परंतु यामुळे वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले की, ही शक्यता निराधार आहे, वीजसंकट कधीही नव्हते आणि कधीही येणारही नाही.
Discussion about this post