व्हीएसआरएस मराठी न्युज –ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे. ते 77 वर्षांचे आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचे कळतंय.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
मात्र, काल बुधवार रोजी ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, अशी बातमी आल्यापासून सर्व माध्यमांवर सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या आहेत. तरी विक्रम गोखले यांचं निधन झाल्याचे वृत्त खोटं असल्याची प्रतिक्रिया विक्रम यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.
वृषाली गोखले म्हणाल्या की, “काल दुपारी विक्रम गोखले कोमात गेले. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती वरखाली होत आहे. पुढे काय करायचं हे डॉक्टर ठरवतील. मात्र, त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे आहे.” त्या पुढे म्हणाल्या, ” मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती, मात्र आता पुन्हा प्रकृती बिघडली आहे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. तसंच, सध्या त्यांना मल्टि ऑर्गन फेल्युअर झाले आहे.” असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
विक्रम गोखले यांचं वय ७७ आहे, मात्र सगळीकडे ८२ सांगण्यात येतंय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. माझी मुलगी सॅन फ्रान्सिस्कोमधून आली आहे. दुसरी मुलगी मुंबईत राहतेय, तीही पुण्यात आली आहे, असंही वृषाली गोखले म्हणाल्या.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांचे परिवारातील मित्र, राजेश दामले म्हणाले, “विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”
विक्रम गोखले लॉकडाऊन काळात मुंबईतून पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यातच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे ते क्वचितच मुंबईत येत असत, अशी माहिती त्यांच्या एका मित्राने दिली.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालवली असल्याने अनेकांनी चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. मात्र, असं असताना अनेकांनी समाज माध्यमांवर त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पत्नी वृषाली गोखले आणि मुलीने फेटाळून लावले आहे. ते सध्या व्हेटिंलेटरवर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले.
Discussion about this post