व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे.
ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.
प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं होतं.
Discussion about this post