व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनिया या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील पांढर्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होते.
त्यामुळे अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञ ड्रॅगन फ्रूट अथवा किवी फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूट व किवी या फळांना अधिक मागणी असल्याचे फळविके्रत्यांनी सांगितले.
डेंग्यू रोखण्यासाठी प्रतिबंध गरजेचा
डेंग्यू आजार पसरण्यास एडिस इजिप्ती हे डास कारणीभूत ठरतात. डेंग्यू झालेल्या रुग्णास एडिस इजिप्ती हा डास चावल्यास रोग्याच्या रक्तातील विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्याला डेंग्यु होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी एडिस इजिप्ताय डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे गरजेचे ठरते. त्यासाठी काही दक्षता घेणे गरजेचे आहे. घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी पाणी वापरुन रिकामी करुन कोरडी केल्यानंतरच त्यात पुन्हा पाणी भरावे.
घरातील पाण्याच्या मोठ्या टाक्या रिकाम्या करता येत नसतील तर त्यावर घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रीजखालील ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणी पाणी वाहते राहील, याची दक्षता घ्यायला हवी, असे महापालिका वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
डेंग्यू सदृश्य ताप आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधुन वेळीच औषधोपचार करावा.
डेंग्यू या आजारामध्ये ताप येणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ई. लक्षणे असतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच लक्षणाकरिता औषधोपचार घ्यावा. डेंग्यु आजारावर कोणतीही लस किंवा निश्चित औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे, याकरिता सतर्कता बाळगण्यासाठी मा. आयुक्त, मनपा यांनी जनतेस आवाहन केले आहे.
Discussion about this post