व्हीएसआरएस मराठी न्युज –देशातील वर्दळीच्या प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नामफलक तसेच अन्य माहिती फलक इंग्रजीसोबत मराठी भाषेत ठळकपणे लावण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
न्यायालयाने सोमवारी या याचिकेची गंभीर दखल घेतली. मात्र सुनावणी घेण्यापूर्वी याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याची आदेश दिले. विशेष म्हणजे गुजराती विचार मंचतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दोन आठवड्यांत याचिककर्त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि दिशादर्शक हे इंग्रजी, हिंदीसह स्थानिक भाषेमध्येही असावेत असे परिपत्रक केंद्रीय गृह विभागाने काढले आहे. म्हणून विमानतळसारख्या सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि दिशादर्शक इंग्रजीसोबतच मराठी आणि देवनागरी भाषेत असायला हवेत.
मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे गुजराती मंचच्या वतीने विनंती करण्यात आली. त्यानंतर या विनंतीची आठवणही करुन देण्यात आली. तरीही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
मुंबई उच्च न्यायालयानेच या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. बोलीभाषा ही प्रत्येक भारतीय नागरिकाचा भावनिक विषय आहे आणि बोली भाषा हा आत्मसन्मान असतो.
आम्ही महाराष्ट्रातील बोली भाषेचा वापर सर्वत्र व्हावा असा आग्रह करत आहोत. मुंबई विमानतळावरील माहिती फलक आणि दिशादर्शक केवळ इंग्रजी भाषेतून असणे हे अत्यंत चुकीचे आहे.
Discussion about this post