पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. नो वर्क नो पे हे धोरण अवलंबण्याचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्यानंतरही कामगारांनी संप सुरूच ठेवला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे महापालिकेचे काम पूर्णपणे बंद आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी व निमशासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत.
संपात पिंपरी-चिंचवड पालिकेतील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. मंगळवारी पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहिले. सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. आजही कर्मचारी पालिकेत आले नाहीत. त्यामुळे पालिकेचे सर्व विभाग बंद आहेत. कर्मचारी न मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माघारी जावे लागले आहे. कार्यालय उघडले नाही. अशा स्थितीत अधिकाऱ्यांना बसायला जागा नव्हती. आज दुसऱ्या दिवशीही पालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले.
Discussion about this post