पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | आतापर्यंत १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाने दिली. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने उच्च शिक्षण संस्थांना दिल्या. महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी महाविद्यालय स्तरावर करण्याबाबत यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र त्यानंतरही शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. उच्च शिक्षण विभागाने प्रलंबित अर्जाच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत पडताळणीसाठी सुमारे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी परिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांवर दररोज कार्यवाही होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची महाविद्यालय स्तरावर पडताळणी होणे आवश्यक आहे.
प्रलंबित अर्जामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही. त्यामुळे सर्व अर्जांची पडताळणी वेळेत होणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठ स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पडताळणीअभावी प्रलंबित अर्जासोबत भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींना संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
Discussion about this post