व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांपूर्वी अवैध धंद्यांवरील झालेल्या छापेमारीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. पाठोपाठ सुरु असलेल्या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दहा दिवसांपूर्वी निगडी, वाकड व देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले. यामध्ये तब्बल ३२ जणांना अटक करण्यात आली. यानंतर लगेचच ज्या ठाण्याच्या हद्दीत छापेमारी झाली त्याच ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची पोलिस आयुक्तांनी चार दिवसांनंतर १८ नोव्हेंबरला तडकाफडकी बदली केली. निगडी ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली.
तर वाकड ठाण्याच्या दोन सहायक निरीक्षकांसह तेरा कर्मचाऱ्यांची तसेच देहूरोड ठाण्याच्या एका सहायक निरीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांची बावधन वाहतूक विभागात बदली केली. त्यांनतर हद्दीतील अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत २३ नोव्हेंबरला निगडी ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना थेट निलंबित केले.
ठाण्यातील तपास पथकात असलेले कर्मचारी सतीश ढोले, विलास केकाण, राहुल मिसाळ, नितीन सपकाळ या चौघांना थेट निलंबित करण्याचे आदेश दिले.
या दोन मोठ्या कारवाईनंतर २५ नोव्हेंबरला निगडी ठाण्यातील पुन्हा नऊ कर्मचाऱ्यांची हिंजवडी वाहतूक विभागात बदली करण्यात आली. हवालदार दत्तात्रय बबन शिंदे, सुधाकर तुकाराम अवताडे, पोलिस नाईक शंकर भागुजी बांगर, सोमनाथ रामदास दिवटे , विजय विठ्ठलराव बोडके, भूपेंद्र खंडू चौधरी, विनोद तान्हाजी व्होनमाने, तुषार पांडुरंग गेंगजे, राहुल बाबूराव गायकवाड अशी बदली झालेल्यांची नावे आहेत.
Discussion about this post