व्हीएसआरएस मराठी न्युज -नागपुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. विशेष म्हणजे आंदोलकांनी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान असं लिहिलेल्या पाटीवर गुजरातचे मुख्यमंत्री असं लिहिण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अतिशय गदारोळ झाला.
आंदोलक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आणि आता एअरबस प्रकल्प, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत. हे फक्त खोके मुख्यमंत्री आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. इथे गुजरातचे सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे”, अशी टीका आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.
युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जवळपास 25 ते 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी बंगल्याबाहेर ‘गुजरातचे मुख्यमंत्री’ अशी पाटीदेखील लावण्याचा प्रयत्न केला. पण काही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
Discussion about this post