व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी – फलटण परिसरात रस्त्यावर झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. येथे तातडीने उपचार सुरु केले होते.
डॉक्टरांनी आठ दिवस त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण दुर्वेवाने रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर उपचारां दरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. व रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटूंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून अवयव दानाच्या केलेल्या आवाहनाला त्याची आई आणि तिचा 22 वर्षीय मोठा भाऊ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, यकृत, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले.
त्यात 52 वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. 39 वर्षीय महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपण केले आणि 53 वर्षीय पुरुषाला यकृत प्रत्यारोपण तर 35 वर्षीय पुरुषाला एक मूत्रपिंड आणि स्वादूपींड प्रत्यारोपित करण्यात आले या सर्व शस्त्रक्रिया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वीरित्या पूर्ण झाल्या तसेच दुसरे मूत्रपिंड सोलापूर येथील रुग्णालयात 47 वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपित केले.
अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.
“आमच्या परिवारातील एक सदस्य गेला हा आमच्या साठी फार मोठा धक्का आहे पण जाताना गरजवंत पाच व्यक्तींना नव जीवन दिले हे फार महान कार्य आज घडले” तो आज या पाच जणांमध्ये जीवंत आहे त्याचे जीवन इतरांसाठी वरदान ठरले”. ही भावना मोठ्या भावाने व्यक्त केली.
मेंदू मृत तरुणाच्या घरची परिस्थिती हलाखीची होती शेतीवर त्याचा उदर्निवाह होता. लहानपणीच वडील गेले होते त्यामुळे आई व त्याचा मोठा भाऊ यांच्या कष्टावर घर चालत होते घरातील छोटा भाऊ गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत अवयवदानाला संमती दिले.
“कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णया बद्दल आम्ही कृज्ञता व्यक्त करतो. नातेवाईकांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. रुग्णालयात अवयव दान व प्रत्यारोपणाची प्रक्रिया येथेच पूर्ण झाली. यासाठी आमचे कुशल व अनुभवी प्रत्यारोपण तज्ञ, विशेष डॉक्टर्स, तंत्रज्ञ, पॅरामेडिकल स्टाफ आणि जागतिक दर्जाच्या सर्व सेवा सुविधा तसेच जलदरित्या कार्यरत असणारी वैद्यकीय यंत्रणा हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाले आहेत” असे डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी सांगितले.
“अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे या घटनेतून दिसून येते आज या कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवलेला एक आदर्श आहे” असे मत डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ भाग्यश्री ताई पाटील यांनी सांगितले त्यांनी कुटुंबीयांचे आभार मानले. या कुटूंबातील सदस्यांना दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
“ या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो” अशी भावना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली त्यांनी अवयवदात्याच्या नातेवाईकांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले “अवयवदान व प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे”.
सहभागी डॉक्टर्स –
हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रियेत डॉ संदीप अट्टावार, डॉ अनुराग गर्ग, डॉ एम. एस बारथवाल, डॉ सुशीलकुमार मलानी भूलतज्ञ् डॉ विपुल शर्मा, डॉ शाहबाझ हसनैन यकृत व स्वादुपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेत रुग्णालयाच्या प्रत्यारोपण विभागाच्या प्रमुख व कार्यक्रम संचालिका डॉ वृषाली पाटील, डॉ मनोज डोंगरे भूलरोग तज्ज्ञ श्रीकांत कोटे व यकृत प्रत्यारोपण प्रक्रियेत डॉ बिपीन विभुते व त्यांची टीम तसेच डॉ शरण नरुटे, डॉ आदित्य दाते यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी 22 तासांचा अवधी लागला.
– प्रत्यारोपणासाठी 5 अद्यवायत शस्त्रक्रिया गृह सज्ज होते.
– रुग्णालयात पहिल्यादाच एक वेळी 5 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या.
– त्यासाठी एकूण 20 डॉक्टर्स व 25 पॅरामेडिकल स्टाफ ने परिश्रम घेतले.
– या रुग्णालयातील पहिले स्वादुपिंड प्रत्यारोपण आहे. एकंदरीत आज पर्यत 2 हृदय प्रत्यारोपण, 2 हृदयसह फुफ्फुसाचे दुहेरी प्रत्यारोपण, 1 फुफ्फुस, 150 मूत्रपिंड, 46 यकृत, 56 नेत्रपटल हे अवयव प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.
Discussion about this post