व्हीएसआरएस मराठी न्युज -आता खाजगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही लसींच्या डोसची किंमत २२५ रुपये आहे. यापूर्वी, खाजगी रुग्णालयांमध्ये, कोविशील्डचा डोस 600 रुपयांना आणि कोवॅक्सिनचा डोस 1,200 रुपयांना मिळत होता.
सर्व प्रौढ नागरिकांना सावधगिरीचा डोस लागू करण्याच्या निर्णयानंतर किंमत कपात जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केले होते की 18+ वयोगटातील सर्व नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. शुक्रवारी, कोव्हशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अदार पूनावाला यांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि एका ट्विटमध्ये लसीची किंमत कमी करण्याची घोषणा केली.
पूनावाला म्हणाले की त्यांची कंपनी खासगी रुग्णालयांमध्ये डोससाठी ६०० रुपयांऐवजी २२५ रुपये आकारेल. दुसरीकडे, लस बनवणाऱ्या भारत बायोटेकच्या संयुक्त एमडी सुचित्रा अल्ला यांनीही एका ट्विटमध्ये लसीची किंमत १२०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.
नुकताच केंद्र सरकारने आपला एक निर्णय जारी केला आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्वांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. येत्या 10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम, तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्रतिबंधात्मक PRECAUTION डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार असून, त्याला आणखी गती दिली जाणार आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Discussion about this post