व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात एन.टी स्कॅन मशिन, एनॉमली स्कॅन मशिन नसल्याने तेथे येणार्या गर्भवती स्त्रियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ थेरगाव रुग्णालयात एन.टी स्कॅन मशिन, एनॉमली स्कॅन मशिन उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्कॅन मशिन्सद्वारे गर्भवतीची तपासणी करणे हा इतर चाचण्यांबरोबर असणारा नेहमीचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतू थेरगाव रुग्णालयात एन.टी स्कॅन मशिन, एनॉमली स्कॅन मशिन अशा प्रकारची वैद्यकीय उपकरणे नसल्याने शासकीय रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम का होत नाही, हे या माध्यमातून स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून येथे स्कॅन मशिन नसल्याने तेथे येणाऱ्या गर्भवती स्त्रियांना तातडीने स्कॅन करायचे असल्यास, त्यांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागते. तात्पुरती आरोग्य यंत्रणा उभी करणे म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. दिवसेंदिवस वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या पाहता शासकिय रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, यासाठी महापालिकेने रुग्णालयासाठी सर्वंकष आरोग्य धोरण निश्चित करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.
Discussion about this post