व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी-वाढते वायू प्रदूषणाची दखल घेतली जावी व लोकांना माहिती व्हावी, म्हणून आयआयटीएम पुणे यांनी सफर नावाचे ऍप बनवले आहे. त्यात हवेची गुणवत्ता, आरोग्यासाठी सल्ला आणि धोका काय आहे हे सांगितले जाते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात अनेक ठिकाणी वायू प्रदूषण दर्शविणारे डिजिटल फलक बसविले आहेत. या दोन्हीचा आढावा घेतला असता शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असून ती आता आरोग्यास हानिकारक होईल अशा स्तरावर पोहचल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात 6 जानेवारीला शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली आहेत. गेल्या 6 ते 27 जानेवारी अवध्या 21 दिवसांमध्ये ती पूर्ण काळी पडली आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येत आहे.
भोसरी परिसरात एमआयडीसी आहे. या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या, लघुउद्योग आहेत. या परिसरात भंगाराची दुकानेही असल्याने घातक कचरा जाळला जातो. परिणामी वायू प्रदूषणात वाढ होते. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात वाहनांची योग्य काळजी न घेतल्याने या परिसरातील हवा जास्त प्रदूषित असल्याचे दिसून येते.
सफर’ ऍपवर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, निगडी, भूमकर चौक या परिसरातील हवेच्या गुणवत्ते विषयी माहिती दिली जाते. त्यात आजच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषित हवा ही भोसरी येथील दर्शविण्यात आली आहे. आजच्या दिवसाचा एक्यूआय 245 आहे.200 पेक्षा जास्त एक्यूआय असणे म्हणजे प्रदुषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post