व्हीएसआरएस मराठी न्युज –नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांवर उपचारासाठीचा केसपेपर काढताना आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे.
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरिबांवर-वंचितांवर माफक दरात उपचार होत असतात, मात्र जर हे उपचार हवे असतील तर आपल्याला या रुग्णालयातील काही बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्यात सर्वप्रथम म्हणजे रुग्णाच्या नावाने केस पेपर फाडणे, आणि याच केस पेपरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या केस पेपरमध्ये एका रकान्यात जात विचारण्यात आली आहे.
अजित पवारांनीही घेतली दखल
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाऊ नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तत्काळ थांबवावेत, ताबडतोब निर्देश द्यावेत अशी मागणी करतो.
अजित पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खतखरेदी करण्यासाठीही जात सांगणं अलिकडे बंधनकारक केलं होतं. त्यावेळीही भविष्यात असे प्रकार थांबवण्याचा आम्ही सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर सुद्धा हा प्रकार घडला आहे.
Discussion about this post