व्हीएसआरएस न्युज नवी दिल्ली: काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीद्वारे विरोधीपक्ष नेत्यांची एकजूट दाखवण्यात येईल.
सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्यांसाठी डिनर कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. या भोजन समारंभाला यूपीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच समविचारी पक्ष द्रमुकचे एमके स्टालिन, तृणमुलच्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
डिनर कार्यक्रमासाठी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दिल्लीत नेत्यांच्या उपस्थितीवर हे सर्व अवलंबून आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे सीपीएमचे नेते मेहनत घेत आहेत. नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच बुधवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले. पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकार चर्चेसाठी तयार नसल्यामुळे संपूर्ण पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात वारंवार अडथळे आणले.
Discussion about this post