व्हीएसआरएस मराठी न्युज -१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) अटक करण्यात आली आहे.
भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानण्यात येत आहे. गेल्या २९ वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणा अबू बकरच्या मागावर होत्या. त्याच्या विरोधात १९९७ मध्येच रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत विविध ठिकाणी १२ बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २५७ जण ठार तर ७१३ जण जखमी झाले होते. अटक करण्यात आलेला दहशतवादी अबू बकरचा या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत सक्रीय सहभाग होता. या साखळी बाम्बस्फोट मालिकेसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्फोटके आणि शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण देणे, बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स उतरवून घेणे आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या घरी या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा कट रचण्यात अबू बकरचा सहभाग होता. अबू बकर हा १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मानण्यात येतो. तेव्हापासून तो संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि पाकिस्तानमध्येच वास्तव्यास आहे. यूएईतील भारतीय यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय तपास यंत्रणांनी अबू बकरला अटक केल्याचे सांगण्यात येते. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Discussion about this post