व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत संपल्याने तेथे सध्या प्रशासकीय कारभार आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
त्यांनी म्हणजे पालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांत प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी कडाडून विरोध करीत पाटील यांना आज (ता.२० जुलै) सज्जड इशारा दिला. जीवघेण्या आजारातून नुकतेच बरे झालेले आमदार जगताप हे लगेचच पुन्हा सक्रिय झाल्याचे यातून दिसून आले आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाची ही नियोजित प्रवेश शुल्कवाढ तातडीने रद्द करा, नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा लेखी इशारा जगतापांनी प्रशासकांना दिला आहे. एकीकडे प्रशिक्षणाच्या नावाखाली पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोणावळ्याला घेऊन जाऊन हॉटेलमध्ये पिंपरी-चिंचवडकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करता आणि दुसरीकडे शहरातील उद्यानांमध्ये विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिक व बालगोपाळांना शुल्क आकारता. हा उधळपट्टीचा आणि निधी गोळा करण्याचा कारभार बिलकूल चालणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी आपल्या स्वभावानुसार आयुक्तांना भरला आहे.
Discussion about this post