व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी घेण्यात येणारी जनसंवाद सभा आता महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी घेण्याचा निर्णय पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयामध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत होते. त्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी म्हणजे महिन्यातून दोनच दिवशी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा होणार आहेत.
महापालिका कार्यालयीन कामकाजाचे प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस असल्याने तसेच दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा असल्याने या सभेमध्ये दाखल झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पुरेसा अवधी प्राप्त होत नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक जनसंवाद सभेच्या प्रारंभी मागील सभेत आलेल्या तक्रारींवर महापालिकेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात येतो. तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचे स्वरूप पाहता तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयांत सकाळी 10 ते 12 या वेळेत जनसंवाद सभा होईल, असे प्रशासनाने कळविले आहे.
Discussion about this post