व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार मुंबईचे दिले आहेत.
या दोन उमेदवारांपैकी भाई जगताप यांचा पराभव करणे हा भाजपाचा उद्देश आहे. कारण भाई जगताप हे अधिक आक्रमक आणि प्रभावी नेते मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाई जगताप आमदार होणे हे विरोधकांना परवडणारे नाही. म्हणूनच त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतो आहे. भाजपा व आपल्या सहाव्या जागेवर ठाम असून आपली सहावी जागा जिंकणारच, असा दावा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
महाविकास आघाडीने घटक पक्षातील प्रत्येक पक्षाने दोन-दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपानेही सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या दोन्ही आघाड्यांनी आपला एक एक उमेदवार मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल आणि त्याच दृष्टीने महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. कारण जर निवडणूक लागली तर ही निवडणूक पुन्हा एकदा महाविकास आघाडीला त्रासदायक ठरणार आहे. प्राधान्य क्रमांच्या मतांच्या गणितात पुन्हा एकदा भाजपा बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. म्हणूनच नामुष्की टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार.
भाजपाने आता त्यांच्या रिक्त होणाऱ्या पाच जागांवर सहा उमेदवार उभे केले आहेत. वास्तविक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रत्येकी सहा उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही बाजूने एकेका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र विधान परिषद निवडणुकीत दोन्ही बाजूंनी आपल्याच विजयाचा दावा सुरू असल्याने पुन्हा एकदा निवडणूक लागली तर ती नक्कीच चुरशीची होणार आहे. 27 मतांचा कोटा यावेळेस असणार आहे. काँग्रेसकडे असलेले बलाबल पाहता त्यांना आणखी दहा मते दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आवश्यक आहेत. ही मते अपक्ष आणि मित्र पक्षांकडून मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार तर, महा विकास आघाडीकडून सहा उमेदवार असणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम राजे निंबाळकर, एकनाथ खडसे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. आमशा पाडवी, सचिन अहिर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.
Discussion about this post