व्हीएसआरएस मराठी न्युज नागपूर -उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. कोरोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर नगरी अधिवेशनासाठी सज्ज झाली आहे.
मुंबईत झालेल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी दांडी मारल्याने शिंदे-ठाकरे समोरासमोर येण्याचा योग जुळून आला नाही. आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने हा योग जुळून येणार आहे.
उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. उद्याचं हिवाळी अधिवेशन फार वेगळं असेल असा दावाही राऊत यांनी केला.
शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याचं राऊत यांनीही स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे हे शिंदे यांना कसे धारेवर धरतात आणि शिंदे हे त्यांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का? एकमेकांशी नजरेला नजर भिडवणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नागपूर अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विदर्भात दोन वर्ष अधिवेशन झालं नव्हतं. त्यामुळे या अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा व्हावी अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांसाठी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचं आयोजन केलं आहे. या चहापानाला विरोधक जाणार की चहापानावर बहिष्कार टाकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Discussion about this post