व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-विमानतळावर सोनं किंवा ड्रग्स आणण्याच्या घटना वारंवार उघड होत असतात. पण, पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडे समुद्रातील तब्बल 466 जिवंत प्रवाळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी दोन प्रवाशांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून एक विमान पुणे विमानतळावर दाखल झालं होतं. यावेळी नियमितपणे सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, या दोन प्रवाशांची हालचाल संशयास्पद वाटली.
त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रवाशांची झाडाझडती घेतली असता प्रवाळ आढळून आले. (Imran Khanचं सरकार कोसळताच पाकच्या महिला पत्रकाराला आठवले अटलजी, शेअर केला Video) प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात प्रवाळ आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. आतापर्यंत सोनं आणि ड्रग्स तस्करीचे प्रकरणं समोर आली होती. पण पहिल्यांदाच प्रवाळ प्रवाशांनी सोबत आणल्याचे पाहून कर्मचारीही हैराण झाले.
या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेले प्रवाळ मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींच्या विरोधात सीमाशुल्क कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी दिली.
प्रवाळांच्या तस्करीचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची व्याप्ती तपासली जात आहे.
Discussion about this post