व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-देशाची ताकद आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक विविधतेत आहे. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आहे. या सर्वधर्मियांच्या शिकवणीचे पालन हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात कर्वेनगर इथल्या हनुमान मंदिरात मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्रीहनुमानजींची आरती करून करण्यात आलं. राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसाचं पठण करुन हनुमान जयंती साजरी केली. सोहेल शेख यांनी रमझानचं दुवा पठण केले.
हनुमान मंदिराच्या प्रांगणात हिन्दू-मुस्लिम बांधवांनी रोजा-इफ्तारचा सहआनंद घेऊन सर्वधर्मसमभावाचं, एकता-बंधुतेचे अनोखं दर्शन घडवलं. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्याचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता यापुढेही करत राहील.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, तसेच राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना घास भरवत त्यांचा उपवास सोडवला. तर उपवास सोडण्याच्या आधी मंदिरातच नमाज पठण केलं अणि लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसेचं पठण देखील केलं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित जमला होता. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी भारत हा सर्वधर्म समभाव देश असून, हजारो वर्षापासून लोक एकोप्याने नांदतात. मात्र आता कुणीही राजकारण करून देशाचा एकोपा मोडण्याचा प्रयत्न करु नये, असा दम देत आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे याची आठवणदेखील त्यांनी करून दिली. त्याचबरोबर जातीजातीतील गरीब लोक भरडले जातात. श्रीमंतांना काहीच अडचण होत नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं. तसेच अलीकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने चुकीची माहिती त्यावर पसरवून तरुणांना चुकीची माहिती दिली जाते. अशी प्रवृत्ती कोणाची असेल तर त्याला कडक कायदा करुन शासन झालं पाहिजे, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडलं.
Discussion about this post