पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली असून, शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर गर्दीच्या मार्गांवरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्तालयात मंगळवारी (३१ जानेवारी) शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल), महामेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), स्मार्ट सिटीचे अधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे कोंडीत भर पडत आहे. काही भागांत मेट्रोचे काम सुरू आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात ठिकठीकाणी कोंडी होत असल्याचे निरीक्षण बैठकीत अधिकाऱ्यांनी नोंदविले.
Discussion about this post