व्हीएसआरएस न्युज ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर झालेला यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. न्यूझीलंडने इंग्लंडला 273 धावांचे लक्ष्य दिले होते, पण इंग्लंडने हा सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले.
अखेरच्या दिवशी 70 षटकांचा खेळ झाला तेव्हा इंग्लंडने 3 गडी बाद 170 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राखला.
2 बाद 62 या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास न्यूझीलंडने नील वॅगनरचा बळी गमावला. त्याने 10 धावा केल्या. यानंतर टॉम लॅथमदेखील 36 धावा करून बाद झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी रॉस टेलरने काही आकर्षक फटकेबाजी करत 33 धावा केल्या. हेनरी निकोलसनेही 23 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडने 6 बाद 169 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि इंग्लंडला 73 षटकांत 273 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून रॉबिन्सनने 3, तर ब्रॉड, रूट आणि वूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली यांनी 49 धावांची सलामी दिली. बर्न्स 25 धावा करून बाद झाला, त्यानंतर जॅक क्रॉउली 2 धावा काढून तंबूत परतला. यानंतर ज्यो रूट आणि सिबली यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. 40 धावा केल्यावर रूट बाद झाला, तेव्हा फक्त 19 षटके बाकी होती.
दुसरीकडे संथ फलंदाजी करताना सिबलीने अर्धशतक फटकावले. इंग्लंडने 70 षटकांत 3 गडी गमावून 170 धावा केल्या. सिबलीने नाबाद 60, तर ओली पोपने नाबाद 20 धावा केल्या. न्यूझीलंड संघाकडून वॅगनरने 2 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात 378 धावा फटकावल्या, त्यात पदार्पणवीर डेव्हन कॉनवेच्या 200 धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव 275 धावांवर संपला होता.