व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारू गावातील तृप्ती श्यामराव निंबळे हिने अहमदनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. याआधी मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या २०१७ मध्ये तृप्तीने थायबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता, तर भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
आसाम येथे पाच स्पर्धेत रजतपदक मिळवले आहे. तर याआधी अनेक स्पर्धेत तब्बल ५९ पदके मिळविली आहेत. तृप्तीची घरची परिस्थिती बेताची असून, तिला अनेक स्पर्धेत भारताचे नाव विविध देशपातळीवर उंचवायचे असल्याचे तिने सांगितले.
यावेळी शौर्य लाटकर सुवर्णपदक, ईश्वरी बनकर सुवर्णपदक, अपर्णा राऊत सुवर्णपदक, स्नेहा सपकाळ यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रशिक्षक म्हणून तृप्ती निंबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
तृप्ती ही उच्च माध्यमिक विद्यालयात आकुर्डी येथे शिकत असून, ती आता शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे घरातूनच मिळाले आहे. तिचे वडील हे कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र चॅम्पियन श्यामराव निंबळे अशी ओळख आहे. तर आई गृहिणी असून तिचा भाऊ हा कुस्ती क्षेत्रातच होता. सन २०१४ मध्ये त्याचे अपघाती निधन झाले. यामुळे तृप्तीने सांगितले, की मला माझ्या भावाचे व वडिलांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे. अनेक पदके मी जिंकली असून, यापुढेही मी देशासाठी खेळणार असल्याचे तिने सांगितले आहे.
Discussion about this post