व्हीएसआरएस न्युज –
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जावेद खान (वय 77) यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. काही दिवसापासून खान यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जुहू येथील मुस्लीम मजलिस कब्रस्तान येथे खान यांचा दफनविधी झाला.
मूळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे असलेले जावेद खान प्राध्यापक होते. पुढे ते काँग्रेससोबत जोडले गेले. 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. 90 मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून तर पुढे सुधाकर नाईक सरकारमध्ये गृहनिर्माण आणि कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.
पुढे 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा जावेद खान यांनी पवारांना साथ दिली. 99 मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर पवारांनी त्यांच्याकडे सिडकोची जबाबदारी सोपविली होती. त्यांनी 2011 मध्ये राष्ट्रवादी सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
खान यांनी मुंबईतील ओशिवरा येथे दोन व नवी मुंबईत एक अशी तीन महाविद्यालये उभारली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. त्यांचे चिरंजीव नदीम जावेद हे काँग्रेसचे माजी आमदार असून, जौनपूर येथील राजकारणात सक्रिय आहेत.