व्हीएसआरएस न्युज तळेगाव दोन मुलींसह पित्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तळेगावा ढमढेरे (ता. शिरुर) येथे घडली आहे.
शिक्रापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील राजेंद्र भुजबळ नोकरीनिमित्त पत्नी व मुलींसह पुण्यात वानवडी परिसरात राहत होते.
राजेंद्र शिवाजी भुजबळ (वय 42), दीक्षा राजेंद्र भुजबळ (वय 10) आणि ऋतुजा राजेंद्र भुजबळ (वय 8 सर्व रा. तळेगाव ढमढेरे) अशी या आत्महत्या केलेल्या पिता-मुलींची नावे आहेत. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मंगळवारी राजेंद्र हे पत्नीला पुणे येथे घरीच ठेवून दीक्षा व ऋतुजा या मुलींना सोबत घेऊन तळेगाव येथे गावी आले होते. त्यांनतर ते अचानक गायब झाले. मात्र, सायंकाळच्या सुमारास येथील शेणाचा मळा येथे उत्तम भुजबळ यांना आपल्या विहिरीच्या कडेला मोठ्या माणसाच्या व लहान मुलींच्या चपला, मोबाईल, पैसे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे भुजबळ यांना शंका आल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने विहिरीच्या पाण्यामध्ये शोधमोहीम सुरू केली. त्यांनतर रात्री साडेबाराच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.