व्हीएसआरएस न्युज पिंपरी- येत्या शुक्रवारी (दि. ६) उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. या पक्षाच्या प्राबल्यामुळे सर्वच्या सर्व पदांवर याच पक्षाचे नगरसेवक आहेत. जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी महापौर आणि उपमहापौरपद हे सव्वा सव्वा वर्षानी बदलण्याचे या पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांत या दोन्ही पदांवर चार जणांना संधी मिळाली. तर उर्वरित अडीच वर्षांमध्ये चार जणांना संधी देण्याचे धोरण आहे. मात्र सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा स्थानिक नेत्यांनी घेतला. हा राजीनामा घेताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने राजीनामा घेतला जात असल्याचे सांगण्यात आले होते.
तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता 6 नोव्हेंबर रोजी नव्या उपमहापौरांची निवड होणार आहे. या निवडीवरून भाजपातील अंतर्गत कलहही समोर आला आहे.
भोसरी, चिंचवड आणि निष्ठावंतांना या पदावर आपल्याच गटाच्या नगरसेवकाला संधी द्यावयाची आहे. त्यामुळे चांगलाच अंतर्गत कलह निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना मानाचे स्थान महापालिकेत नाही. पिंपरीतील नगरसेवकाला संधी मिळावी यासाठी निष्ठावंत आग्रही आहेत. तर भोसरी आणि चिंचवडकर आपल्याच मतदारसंघातील नगरसेवकाला संधी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होते हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
उपमहापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा आणि मनसेचा पाठिंबा मिळू शकतो. भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यास तसेच नगरसेवक अनुपस्थित राहिल्यास राष्ट्रवादीला लॉटरी लागू शकते. मात्र भाजपाचे सध्याचे संख्याबळ आणि स्थानिक आमदारांची नगरसेवकांवर असलेली पकड पाहता उमेदवार कोण? यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.