व्हीएसआरएस न्युज पुणे – पुणे शहरात वाहन चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. दररोज, सरासरी पाच वाहनांची चोरी होत असून यातही हडपसर, चतुश्रृंगी, सिंहगड, भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरांचा सुळसुळाट अधिक आहे.
यामुळे संबंधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनीक ठिकाणी वाहन उभे करताना नागरिकांनी नक्कीच काळजी घ्यावी, अशी परिस्थिती आहे.
वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सातत्याने नाकाबंदी आणि सराईतांची झाडाझडती घेतली तसेच अनेकदा विशेष मोहिम राबवली जात आहे. मात्र, वाहन चोरीचा आलेख वाढताच आहे.
सराईत वाहन चोर जामिनावर सुटल्यावर पुन्हा वाहन चोरीकडे वळतात. तर, दुसरीकडे अल्पवयीन मुले व तरुण नव्याने वाहन चोरीच्या गुन्हे करीत आहेत.
यामुळे वाहन चोरांवर अंकुश ठेवणे अवघड होत आहे. वाहन फक्त विकण्याच्याच उद्देशाने चोरले जात नाही. यातील बहुतांश गुन्हे हे चोरलेले वाहन पेट्रोल संपेपर्यंत वापरुन नंतर ते रस्त्यात सोडून देण्यासारखे प्रकारही घडले आहेत. तर, काही तरुण मित्र, मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी वाहन चोरतात. यातून रस्त्यावर वेबारस सोडलेल्या वाहनांचे मालक शोधणे हे ही एक मोठे दिव्य पोलिसांपुढे असते. यामुळे वाहन चोरी एक प्रकारची सामाजिक समस्याच झाली आहे.