पिंपरी-चिंचवड शहरात निदर्शने आंदोलन
पिंपरी – आम आदमी पक्षाने मूलभूत प्रश्नांवर काम करत पाण्याचा ज्वलंत प्रश्न हाती घेत पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ३० एप्रिल रोजी महापालिके विरोधात निदर्शने करत नागरिकांच्या सहभागाने एक व्यापक आंदोलन केलं. आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधील आम आदमी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना नेहेमीच सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यावर काम करणाऱ्या आम आदमी पक्षाने पिंपरी चिंचवड भागात सर्वात ज्वलंत अशा पाणी प्रश्नावर आंदोलन करत त्याला वाचा फोडली.
ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न आ वासून उभा
पाणी म्हणजे जीवन आणि ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड मध्ये पाणी प्रश्न आ वासून उभा आहे, अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, बऱ्याच भागात तो अनियमित असून, पाणी कपात देखील सहन करावी लागत आहे, हे कमी होते म्हणून काय तर अनेक भागात दूषित पाणी पुरवठा देखील होत असून नागरिकांचं रोजचं जगणच कष्टप्रद झालेलं आहे.
प्रशासनाचा नियोजन अभाव…
आप शहर प्रवक्ता प्रकाश हगवणे यांनी महापालिकेच्या ढासळलेल्या कारभारावर बोट ठेवत नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्याच्या नगरसेवकांच्या वृत्तीबद्दल खेद व्यक्त केला. पाण्याची योग्य प्रमाणात उपलब्धता असतानादेखील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना या प्रश्नाला तोंड देत पाणी कपात आणि अनियमित पुरवठा सहन करावा लागत आहे याबद्दल देखील संताप व्यक्त केला.
मूलभूत प्रश्नांवर काम होत नाही…
प्रचारप्रमुख राज चाकणे यांनी पाणी तसेच आरोग्याच्या प्रश्नांवर आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने केलेल्या कामगिरीचा दाखला देत पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील नागरिकांसाठी अशा सोयी-सुविधा करण्याची गरज असल्याचे नमूद केले तसेच ते करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक वृत्ती महापालिकेमध्ये दिसत नाही व अनेक प्रसंगी महापालिकेला निवेदन देऊन देखील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम होत नाही याबद्दल याबद्दल खेद व्यक्त केला.
Discussion about this post