व्हीएसआरएस न्युज जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी याने मर्यादित षटकांच्या सामन्यातील कारकीर्द लांबवण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
डुप्लेसीने आगामी दोन टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी तसेच त्याच्या तयारीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
डुप्लेसीने या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध अखेरची कसोटी खेळली. 36 वर्षीय या डुप्लेसीने 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात 375 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या होत्या. या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार होता.
पण करोनाच्या धोक्यामुळे हा दौरा रद्द झाला व त्याचवेळी डुप्लेसीने निवृत्तीचा निर्णय घेतला.
2016 साली दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे त्याला कर्णधार करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच कर्णधार म्हणून डुप्लेसीने विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. 2018 साली देखील ऑस्ट्रेलियाला त्याच्या नेतृत्वाखालील संघाने घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याने नेतृत्व केलेल्या 27 कसोटीपैकी 17 मध्ये विजय मिळवला होता.
69 कसोटीत त्याने 118 डावात 40 पेक्षा जास्त सरासरीने 4 हजार 163 धावा केल्या. ज्यात 10 शतके व 21 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत 199 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.