व्हीएसआरएस न्युज पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा मानला जात आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरदचंद्रजी पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते, शहरप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
‘आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही.’ – प्रशांत जगताप (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे)
Discussion about this post