व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) झाला.
. मुंबईतील वानखेडे स्टेडियवर झालेल्या या सामन्यात चेन्नई संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने चेन्नईला १०७ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने १५.४ षटकांत ४ विकेट गमावत सहज पूर्ण केले.
चेन्नईच्या या विजयात दिपक चाहरच्या ४ विकेट्स, तसेच मोईन अली आणि फाफ डू प्लेसिसने केलेली अर्धशतकी भागीदारी महत्त्वाची ठरली.
पंजाबने दिलेल्या १०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईकडून सलामीला फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली.
मात्र, ऋतुराज ५ व्या षटकात आर्शदिप सिंगच्या गोलंदाजीवर दिपक हुडाकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ५ धावा केल्या. यानंतर मात्र, मोईन अलीने आक्रमक खेळत फाफ डू प्लेसिसला चांगली साथ दिली. या दोघांनी ६६ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मुरुगन अश्विनने मोईन अलीला बाद करत तोडली. मोईन अलीने ३१ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.
तो बाद झाल्यानंतर सुरेश रैना विजयासाठी केवळ ८ धावांची गरज असताना १५ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ८ धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठच्या चेंडूवर लगेचच अंबाती रायडू शुन्यावर बाद झाला.
अखेर फाफ डू प्लेसिस आणि सॅम करनने आणखी पडझड होऊ न देता चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले. सॅम करनने १६ व्या षटकात चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. फाफ डू प्लेसिसने नाबाद ३६ धावा केल्या आणि सॅम करनने नाबाद ५ धावा केल्या.
पंजाबचे चेन्नईला १०७ धावांचे आव्हान
चेन्नईने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर रोखले. त्यामुळे आता चेन्नईसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते.
पंजाबने १५ षटकांत ६ विकेट्स गमावल्यानंतर १७ व्या षटकांत मुरुगन अश्विनही ६ धावा करुन बाद झाला. एका बाजूने विकेट जात असल्या तरी दुसऱ्या बाजूने शाहरुख खानने एकाकी झुंज दिली. मात्र, तोही अखेरच्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजदाकरवी झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूच ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबला १०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
चेन्नईकडून दिपक चाहरने ४ षटकांत १३ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ड्वेन ब्रावो, सॅम करन आणि मोईन अलीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिपक चाहरच्या ४ विकेट्स
पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण पहिल्याच षटकात मयंक अगरवालला दिपक चाहरने शुन्यावर त्रिफळाचीत केले. तर तिसऱ्या षटकात पंजाबचा कर्णधार केएल राहुलला रवींद्र जडेजाने केलेल्या अफलातून थ्रो करत धावबाद केले. राहुलने ५ धावा केल्या. त्यापाठोपाठ चाहरच्याच गोलंदाजीवर ५ व्या षटकात ख्रिस गेल आणि निकोलस पूरन बाद झाले. गेलने १० धावा केल्या. तर पूरनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर दिपक हुडाही खास काही करु शकला नाही. तो ७ व्या षटकात १० धावा करुन चाहरच्याच गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर शाहरुख खान आणि झाय रिचर्डसनने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र १३ व्या षटकात मोईन अलीने रिचर्डसनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले.
चेन्नईने जिंकली नाणेफेक
या सामन्यात चेन्नई संघाने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – ऋतूराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.
पंजाब किंग्स – केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार) मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिले मेरिडथ, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह