व्हीएसआरएस न्युज –जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 339 व्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. शुक्रवारी तीन वाजून पाच मिनिटांनी तुकोबांच्या पालखीने देहूतील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले होते.
पहिल्या दिवशी प्रथेनुसार पालखीचा देहूतच इनामदार वाड्यात मुक्काम होता. शनिवारी (दि. 29 जून) विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला हा वैष्णवांचा मेळा फुलांनी सजविलेला रथासह सकाळी अकराच्या सुमारास इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
टाळ-मृदंगाच्या गजरात इनामदार वाड्यातील पहिला मुक्काम पूर्ण केल्यावर संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूतून फुलांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप घेतला. आपले निस्सीम मुस्लीम भक्त अनगडशाहवली बाबाच्या दर्ग्याला तुकोबांच्या पालखीने भेट दिली. यावेळी दोन्ही धर्मियांमधील एकोपा दिसून आला.
त्यानंतर शनिमंदिराजवळ विसावा घेवून भारतीय सैन्य दलाला तसेच मार्गावरील ग्रामस्थ, शहरवासीयांना दर्शनाचा लाभ देत तुकोबारायांचा पालखी सोहळा उद्योगनगरी पिंपरी चिंचवड महापालिकेत आला. येथे शहरवासियांनी केलेले स्वागत स्विकारुन , संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज आकुर्डी येथे आगमन झाले असता उपस्थित राहुन वंदन केले. तसेच तुकाराम महाराजांचे वंशज (१२ वी पिढी) श्री मदन माेरे साहेब यांचा सन्मान विश्व श्रीराम सेनाचे अक्रम शेख यांनी केला. यावेळी विश्व श्रीराम सेनाचे श्यामबाबू गुप्ता , सिद्दार्ध वानखेडे व मित्रमंडळी उपस्थित हाेती. अक्रम शेख यांच्याकडून दरवर्षी वारकरी मंडळींनी अल्पाेहार आणि माेफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा हे आयाेजन करण्यात आले होते.
आज शनिवारी (दि. 29) सायंकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामी विसावली. तुकोबांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 30 जून) आकुर्डी येथून मार्गस्थ होत मुंबई-पुणे महामार्गाने विद्येचे माहेर घर पुणे येथे मुक्कामासाठी सायंकाळी पोहचेल.
Discussion about this post