व्हीएसआरएस न्युज अयोध्या -अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सढळ हाताने देणगी दिली जात आहे. त्यामुळे महिनाभराच्या आत तब्बल 1 हजार कोटी रूपयांचा निधी जमा झाला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी मंदिर उभारणीसाठी देणगीचा ओघ सुरू असल्याची माहिती दिली. मंदिर उभारणीसाठी देणगीरूपाने निधी जमवण्याचे अभियान 15 जानेवारीपासून हाती घेण्यात आले. निधी जमवण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) सुमारे दीड लाख कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे. तो निधी तीन राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ठेवला जात आहे.
त्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदामध्ये ट्रस्टने खाती उघडली आहेत.
त्या बॅंक खात्यांमध्ये आतापर्यंत 1 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे. समाजातील सर्व घटक राम मंदिरासाठी योगदान देत आहेत. अगदी दुर्गम खेड्यांतूनही देणगी दिली जात आहे, असे राय यांनी नमूद केले.