व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -राज्यातील विधान परीषद 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत.
पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे. उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002) होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे.
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.
Discussion about this post