व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-गणेशोत्सवानंतर पुण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे.
मुंबईच्या तुलनेत पुण्यात सक्रिय रुग्ण वाढले आहेत. राज्यातील २७ टक्के सक्रिय रुग्ण पुण्यात असल्याची माहितीही खात्यातर्फे देण्यात आली.
पुण्यात ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक निघाली. कोरोना उद्रेकात दोन वर्षे ही मिरवणूक निघाली नव्हती. त्यामुळे या वर्षी अनंत चतुर्दशीला निघालेल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. रात्रीही लक्ष्मी रस्त्यासह टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नऊ दिवसांनी पुण्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य खात्यातर्फे दिलेल्या माहितीतून दिसते.राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मिळून चार हजार ५४० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे एक हजार २२२ (२७ टक्के) रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई (एक हजार ७१) महापालिकेत रुग्ण आढळले आहेत.
१६ सप्टेंबरपर्यंत पुण्याच्या तुलनेत मुंबईमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलले असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एकही हजार २१७ सक्रिय रुग्ण होते. पुण्यात ही संख्या एक हजार १४५ होती.गणपतीच्या दिवसांमध्ये कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. लक्षणे दिसत असली तरीही गणपतीनंतर दाखवू, ही मानसिकता नागरिकांमध्ये होती. त्यामुळे या काळात रुग्णसंख्या कमी झाली. आता चाचण्या वाढल्या आहेत. त्यातून रुग्णसंख्येचा आकडा काहीसा वाढल्याचे दिसते. असे साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं .
पिंपरी शहराच्या विविध भागातील केवळ 9 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली.
कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 69 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 406 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 396 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
तर, 10 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 278 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 71 हजार 380 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
Discussion about this post