पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | आगीत कारखान्यातील लाकडी साहित्य भस्मसात झाले. सुदैवाने आगीत कोणी जखमी झाले नाही. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका फर्निचर कारखान्यात मंगळवारी सायंकाळी आग लागली. फर्निचर कारखान्यातील रायायनिक द्रावण असलेल्या पिंपांनी पेट घेतल्यानंतर स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराट उडाली. धायरीतील गणेशनगर भागातील कारखान्यात मंगळवारी (१४ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत आग भडकली. फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात रायायनिक द्रावण असलेले पिंप होते. आग लागल्यानंतर रासायनिक द्रावण ठेवलेल्या पिंपाचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहायाने पाण्याचा मारा करुन रात्री साडेआठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
Discussion about this post