व्हीएसआरएस मराठी न्युज –
निगडीतील भक्ती-शक्ती चौक, पेठ क्र.२४ हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करण्यात यावा, या मागणीसाठी आज (दि. २४) टाळ व घंटानाद आंदोलनकरण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौक येथे पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या भूखंडापैकी काही क्षेत्राचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे. सदर भूखंडावर अनेक वर्षापासून अनेक महापुरुषांच्या जयंतीचे व उत्सवांचे कार्यक्रम केले जातात. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती त्याठिकाणी सार्वजनिकरित्या साजरी केली जाऊ शकते. तसेच निगडी गावठाणचा जत्रा महोत्सव, किर्तन सप्ताह, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य सभा संमेलने, कामगार मिळावे व सर्व राजकीय पक्षांच्या सभा होण्यासाठी हा भुखंड खुला राहणे शहर विकासासाठी महत्त्वाचे आहे. इतर वेळी या खुल्या भूखंडाचा वापर मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून देखील होऊ शकतो.
हा भूखंड पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नियोजन क्षेत्रात होता व प्राधिकरणाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत हा भूखंड मोकळाच आहे. सदर भूखंड शहरातील प्रमुख अश्या भक्ती-शक्ती शिल्पसमूहालगत आहे. तसेच जगदगुरु संत तुकाराम महाराज देहू – पंढरपूर या पालखीमार्गावर आहे. पीएमआरडीए मार्फत सदर भूखंडाचे प्लॉट पाडून त्यातील काही क्षेत्र विक्री करण्यात आले आहेत. परंतु निगडी परिसरातील नागरिक व प्रामुख्याने वारकरी मंडळी आणि शिवभक्त यांचा व शहरातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक मंडळांचा या भूखंड विक्रीला तीव्र विरोध आहे. पीएमआरडीएने सदर भूखंड विक्री रद्द करून सदरचे भूखंड है सार्वजनिक वापराचे प्रयोजनासाठी राखीव ठेवावा अशी सर्वांचीच मागणी आहे.
Discussion about this post