व्हीएसआरएस मराठी न्युज –
भारतामध्ये मधुमेहासह जगणारे, अनेक लोक हृदयाशी संबंधित गुंतागूंतींची तक्रार नोंदवित आहेत. या गुंतागूंतीचे वाढते प्रमाण तुलनेने तरुण लोकसंख्यागटामध्येही आढळून येत आहे ही तर अत्यंत चिंताजनक बाब आहे. मधुमेहाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराइड्सची वाढलेली पातळी यांसारख्या कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढविणाऱ्या घटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणूनच लोकांनी ग्लुकोजच्या पातळीतील मोठे चढउतार टाळण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आणि त्यासाठी सखोल उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयासाठी उपकारक आहारपद्धतीचा स्वीकार, व्यायामातील सातत्य आणि ग्लुकोजवर देखरेख ठेवणाऱ्या CGM सारख्या उपकरणांचा नियमित वापर असे काही मोजके उपाय यासाठी करता येतील.”
मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींना आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुढील पाच सोपे उपाय करता येतील:
रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमितपणे देखरेख: FreeStyle Libre सारख्या CGM साधनांच्या माध्यमातून रक्तातील साखरेच्या पातळीचा हरक्षणी माग ठेवल्यास तुम्ही या पातळीत होणाऱ्या कोणत्याही चढउतारांवर लक्ष ठेवू शकता. दिवसातून किमान १७ तासांसाठी ग्लुकोजची इष्टतम पातळी (७० – १८० mg/dl) जपली जावी यासाठी धडपड करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही तुमचा मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका प्रभावीपणे नियंत्रणात ठेवू शकता.
हृदयासाठी उपकारक आहार: कोलेस्ट्रोलची पातळी वाढविणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळा. उदाहरणार्थ, बटर, रेड मीट आणि संपूर्ण स्निग्धांश असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स सर्रास आढळून येतात तर ट्रान्स फॅट्स हे साधारणपणे तळलेल्या किंवा प्रकियायुक्त पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अंशत: हायड्रोजनीकरण केलेल्या तेलांमध्ये असतात. स्वत:ला साजेशी अशी एक आरोग्यपूर्ण आहारयोजना तयार केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. निव्वळ प्रथिनं, अखंड धान्ये, रंगीत भाज्या आणि नट्स आणि बियांतून मिळणारे हेल्थी फॅट्स यांचा समावेश असलेले आहारनियोजन तुम्ही करू शकता.
नियमित व्यायाम: हृदयरोगाचा धोका कमी करायचा तर व्यायामाच्या माध्यमातून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रोलची उच्च पातळी यांसारख्या बाबींवर उपाय करणे योग्य ठरेल. नियमित शारीरिक हालचालींमुळे मधुमेहाचेही अधिक चांगले व्यवस्थापन होते. निरोगी जीवनशैलीसाठी बैठ्या गोष्टींसाठीचा वेळ कमी करा आणि दर आठवड्याला ब्रिस्क वॉकिंग किंवा सायकलिंग यांसारख्या मध्यम स्वरूपाच्या शारीरिक व्यायामांसाठी किमान १५० मिनिटे काढा.
धूम्रपान आणि मद्यपानास नकार: धूम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे अस्तर खराब होऊ शकते व याच्या परिणामी मधुमेहामुळे धमन्या अरुंद होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही धूम्रपानही करत असाल तर तुमच्या हृदयाच्या आरोग्याला असलेला धोका आणखी वाढतो. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडून देणे अधिकच महत्त्वाचे ठरते. तुम्ही अल्कोहोलचे प्रमाणही कमी केले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या मधुमेहाच्या औषधांच्या कामगिरीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर याचा परिणाम होऊ शकतो. अतिरेकी मद्यपानामुळे रक्तदाबही वाढू शकतो, हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि काही विशिष्ट हृदयविकारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. तुम्ही आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून अल्कोहोल घेण्याची मर्यादा ठरवू शकता.
ताणतणावांचे व्यवस्थापन: तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा तुमचे शरीर स्ट्रेस हार्मोन्स निर्माण करते, जे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ करते आणि त्यातून इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. कालांतराने यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि तुम्हाला हृदयविकार जडण्याच्या शक्यताही वाढतात. मनावरील ताण हलका करण्यासाठी गाणी ऐकणे, योगा किंवा नृत्यासारख्या काही मौजेच्या कामांमध्ये स्वत:ला गुंतविण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालविल्याने किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत याबद्दल त्यांच्याशी चर्चा केल्याने ताणतणावाची पातळी खाली येऊ शकते.
या सूचनांबरोबर मधुमेही व्यक्तींनी हायपरग्लायसेमिया किंवा हायपोग्लायसेपियाकडे काही चिंताजनक कल दिसत आहे का याविषयीही दक्ष राहिले पाहिजे. आपल्या मधुमेहाच्या व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करता येणाऱ्या इतर उपाययोजनांविषयीही तुम्ही आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे.
निरोगी जीवनशैलीसाठी पूरक असे पर्याय निवडून तुम्ही चांगल्या आरोग्याचा लाभ घऊ शकता आणि एक अधिक उच्च दर्जाचे आयुष्य जगू शकता.
डॉ अनिरुद्ध टोणगांवकर (डायरेक्टर स्टलिंग मल्टीस्पेशालीटी हास्पिटल )
मधुमेह तज्ञ, जनरल फिजिशियन
Discussion about this post