व्हीएसआरएस मराठी न्युज –देहू – आळंदी रस्त्यावर चिखली परिसरात आज पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. वनविभाग, प्राणी मित्र संघटना आणि चिखली पोलिसांच्या मदतीने अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
चिखली परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. आज (दि.२८) पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू- आळंदी रोडवरील चिखली जवळ बिबट्या काही नागरिकांना दिसला होता. तसेच सीसीटीव्ही मध्येही बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
लोकवस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यामुळे त्याला पकडण्यात मोठी अडचणीत होती. सुरुवातीला हा बिबट्या सोनवणे वस्ती परिसरातील एका गोडाऊन मध्ये लपला होता. त्यानंतर तेथून तो पळून सुदर्शननगर समोरील ज्वारीच्या शेतात तो घुसला होता. दरम्यान शेजारीच असलेल्या अशोक मोरे यांच्या गोठ्यात देखील हा बिबट्या घुसला होता. या गोठ्यात जनावरे असल्यामुळे भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. अखेर वनविभाग आणि पोलिसांच्या टीमला या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.
Discussion about this post