व्हीएसआरएस न्युज दिल्ली २८-गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी नेता म्हणून ओळख असणारा कन्हैया कुमार आणि गुजरातमध्ये अपक्ष आमदार असलेला जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.
आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज भगतसिंग यांच्या जयंतीचं औचित्य साधत या दोघांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कन्हैयाने लाल तर जिग्नेश मेवाणीने निळा शर्ट घालत प्रतिकात्मकरित्या आपल्या वैचारिकतेचं दर्शन घडवत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने आपल्या पक्षप्रवेशामागची भूमिका विषद केली आहे.
यावेळी बोलताना कन्हैया कुमार म्हणाले आहे की, ‘मला असे वाटते की या देशातील काही लोक, ते फक्त लोक नाहीत, ते एक विचार आहे. ते या देशाची परंपरा, संस्कृती, मूळ इतिहास, वर्तमान आणि भविष्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठेतरी मी वाचले होते की तुम्ही तुमचा शत्रू निवडा, मित्र आपोआप बनतील. तर मी आता निवड केली आहे. आम्हाला लोकशाही पक्षात सामील व्हायचे आहे, कारण आता असे वाटते की जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही.’
Discussion about this post