व्हीएसआरएस न्युज विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला कार्तिकी एकादशी निमित्त 14 प्रकारच्या देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्या दृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.
Discussion about this post