व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात आज खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आगामी महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत शिवसेना कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना व मार्गदर्शन संजय राऊत यांनी केले.
तसेच पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, आगामी महानगरपालिकेची तयारी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. यावेळी आगामी महानगर पालिकेत शिवसेनेचा महापौर बसवायचा. या करिता शिवसेनेचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहे. भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, पिंपरी चिंचवड मागील पाच वर्षात झालेले नाही. हाच मुद्दा घेऊन भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड असा नारा देत शिवसेनाही महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आणि आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची, शहर कसे सांभाळायचे.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कडून भाजप मध्ये गेलेले नगरसेवकच परत राष्ट्रवादीमध्ये येतील. तसेच शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त शहरात निवडून येतील व भाजप यावेळी महानगर पालिका काबीज करू शकणार नाही. व सतत पक्ष बदलणारे हे स्वतःसाठी पक्ष बदलत असतात.
राष्ट्रवादीबरोबर आगामी महानगर पालिकेत आघाडी करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, सन्मानजनक जागा मिळाली तर आम्ही राष्ट्रवादीशी आघाडी करू, नाहीतर आम्ही आमचे नगरसेवक स्वतंत्ररित्या लढविण्यास तयार आहोत. आम्ही असं म्हणतच नाही की, राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. शेवटी राज्यात महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोतच.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मुंबईचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत सांगताना संजय राऊत यांनी सांगितले की, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत तक्रार राज्य शासनाकडे आली आहे. आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या जे काही चालले आहे. सत्ताधारी मार्फत ती जनतेची लूट आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख पुणे जिल्हा बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नगरसेवक राहुल कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी मान्यवर व शिवसैनिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post