व्हीएसआरएस न्युज पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत बोगद्यात भरधाव इनोव्हा कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कामानिमित्त घवले कुटुंब मुंबईवरुन पुण्याला जात होते. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने पुढे असलेल्या ट्रकच्या मागील बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
अपघातात मुंबईतील जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित रामलिंग घवले यांचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील त्यांचे नातेवाईक शंकरगोडा यत्नाल यांनाही अपघातात प्राण गमवावे लागले. तर गाडीचा चालक आणि अभिजित घवले यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.