पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आणि महापालिकेच्या नसबंदीच्या कामावर ताशेरे ओढले. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी सध्या दोन संस्था कार्यरत आहेत. पाच झोन आणि समाविष्ट गावांची व्याप्ती पाहता आणखी दोन-तीन संस्थांची आवश्यकता आहे. सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवून दोन संस्थांची निवड करण्यात आली. मात्र, तांत्रिक बाबींमुळे संबंधित संस्थांचे कामच सुरू झालेले नाही. परिणामी, कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
वडगाव शेरीमध्ये लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली.
परिसरातील सर्व कुत्र्यांना आठ-दहा दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. सनसिटी परिसरात जवळपास 90 मोकाट कुत्री असून, त्यापैकी 40 कुत्री गुरुवारपर्यंत महापालिकेने ताब्यात घेतली. नसबंदी झालेल्या कुत्र्यांच्या लसीकरणाचे आणि नसबंदी न झालेल्या कुत्र्यांच्या नसबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे युनिव्हर्सल आणि कॅनाईन केअर कंट्रोल या दोन संस्थांतर्फे शहरातील सहा पाँडमध्ये नसबंदी केली जाते. निविदा काढून दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली असली तरी एका संस्थेला जागा मिळत नसल्याने आणि एका संस्थेने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रत्येक झोनअंतर्गत एका संस्थेने जबाबदारी घेतल्यास मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे काम वेगाने होऊ शकते.
Discussion about this post