पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (२६ फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, मविआ उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत असणार आहे.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, या अगोदर मी साहेबांसाठी मतदान करायचे आज मी स्वतः साठी मतदान केले, याबद्दल थोडीशी हुरहूर मनात आहे, अशा भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली.
यंदाच्या निवडणुकीचा प्रचार करताना मी विकास आणि साहेबांनी केलेली कामे याच मुद्द्यावर नागरिकांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करत होते. तसेच साहेबांवर प्रेम करणारे जे लोक आहेत, कारण साहेबांना सगळे जण भाऊ म्हणायचे, साहेब गेल्यानंतर सहानभुती असणारच कारण साहेबांनी जे काम केलं आहे, त्याचे फळ आम्हाला नक्की मिळणार, असा विश्वास यावेळी अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला. येणाऱ्या दोन तारखेला त्याचे निकाल तुम्हाला दिसेल असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहे. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजल्या पर्यंत ३.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Discussion about this post