व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच अनुषंगाने 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही मदान यांनी सांगितले.
Discussion about this post