व्हीएसआरएस न्युज पिंपरी- गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे.
यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.
रिंगण आणि रथोत्सावाला केवळ 15 वारकऱ्यांना परवानगी राहणार आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देहू आणि आळंदी येथून 100 वारकऱ्यांना परवानगी दिली जाईल. तर 10 बसमधून 20 पालख्या नेण्यात येणार आहेत. या सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
प्रत्येक बसमध्ये 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. वाखरी पासून पंढरपूरपर्यंत दीड किलोमीटर अंतरावर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पायी पालखी सोहळ्याला परवानगी असेल. कोरोनाच्या सर्व नियमांची काळजी घेऊनच पालखी सोहळ्यांचे नियोजन केले जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाचे संकट अजून कायम आहे. पायी पालखी सोहळ्याला परवानगी दिल्यास लोक उत्साहात घराबाहेर पडून गर्दी करतील. वारकरी सर्व नियम पाळतील पण लोकांना थांबवता येणार नाही. त्यामुळं पायी वारीला परवानगी दिली नाही. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. वारीची परंपरा टिकवण्यासाठी हा मध्यम मार्ग काढला आहे, असे पवार यांनी सांगितलं.
राज्यातील दहा मानाच्या पालख्या :
– संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )
– संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
– संत सोपान काका महाराज ( सासवड )
– संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
– संत तुकाराम महाराज ( देहू )
– संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
– संत एकनाथ महाराज ( पैठण )
– रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
– संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
– संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )
Discussion about this post